प्रचारयुद्ध : ‘सेनेला मत म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला मत
संदीप प्रधान - मुंबई
केंद्रात बहुमत दिले आता राज्यात बहुमत द्या, हेच विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या प्रचाराचे मुख्य सूत्र असेल, तर त्याचवेळी शिवसेना राज्यातील भाजपा नेते व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना टीकेचे लक्ष्य करणार असल्याचे समजते.
भाजपाने महायुतीमधील तणाव पाहून स्वबळावर लढण्याची तयारी अगोदरपासूनच केली होती. तशा जाहिराती करण्याचा निर्णय अगोदर घेतला होता. त्यानुसार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे पाहून भाजपा मते मागणार आहे. लोकसभा निवडणुकीत युतीने ‘मनसेला मत म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मत असा जो प्रचार केला, त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत भाजपा ‘शिवसेनेला मत म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला मत असा प्रचार करणार आहे.
शिवसेनेला रोखण्याकरिता मुंबई-ठाणो परिसरात मोदींच्या तीन ते चार सभा आयोजित करण्याचे भाजपाने ठरवले आहे. मुंबईतील गुजराती, उत्तर भारतीय व मुख्यत्वे अमराठी भाषिक भाजपाकडे खेचण्याची आणि मराठी मतांमध्ये फूट पाडण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.
शिवसेनेने आपल्या प्रचारात महाराष्ट्रातील भाजपाचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर टोकाची टीका करणार नाही, असे शिवसेनेतील नेत्यांचे मत आहे.
मोदी टीकेचे लक्ष्य नाही
मोदी यांच्याबाबत जनतेमध्ये सहानुभूती असल्याने त्यांना लक्ष्य केले तर त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो. शिवाय गुजराती व हिंदी भाषिक मतदारांमध्ये चुकीचा संदेश जातो, असे या नेत्याने सांगितले. महायुती होण्याकरिता शिवसेनेने 21 जागा सोडण्याचा त्याग केला. परंतु भाजपा तीन जागा सोडायला तयार झाला नाही, हे मतदारांवर ठासवण्यात येणार आहे.