भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचा सर्वात मोठे सरदार जर कुणी असतील, तर ते शरद पवार आहेत, याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. तुम्ही काय आरोप करत आहात आमच्यावर? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचाराला संस्थात्मक करण्याचे काम कुणी केले असेल, तर शरद पवार ते आपण केले, हे मी डंके की चोट पे सांगतो,” अशा शब्दात आज अमित शाह यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. यानंतर आता महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शाह यांच्या शरद पवारांवरील टीकेसंदर्भात प्रश्न केला असता अजित पवार म्हणाले, "यासंदर्भात मला काहीही माहीत नाही. मी सकाळपासून पुण्यात पिंप्री-चिंचवडमध्ये आहे. ते नेमके काय बोलले आहेत? ते ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देईन." दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी उपस्थित असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली.
आणखी कायम म्हणाले अमित शाह? -मराठा आरक्षणावरून शरद पवारांना लक्ष्य करताना शाह म्हणाले, "महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वेगवेगळे संभ्रम पसरवण्यास सुरुवात केली आहे. मी आज शरद पवार यांना विचारू इच्छितो की, आमच्याकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे सर्वजण बोलत आहेत. आता मी एक निरीक्षण नोंदवू इच्छितो, जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं. मात्र जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेवर येतात तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं, असं अमित शाह म्हणाले.
काँग्रेसवरही निशाणा - यावेळी अमित शाह यांना काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसवाले प्रचंड अपप्रचार करत आहेत. आम्ही गरीब, दलित, आदिवासींचं कल्याण करणार, असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र मी आज हे विचारायला आलो आहे की, ५८ वर्षांपर्यंत तुमची सत्ता होती. या काळात तुम्ही गरिबांसाठी काय केलं. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं दूर राहिलं. यांनी त्यांचे विचार नष्ट करण्याचं काम केलं. दहा वर्षांमध्ये गरीबांचं कल्याण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं आहे, असेही अमित शाह म्हणाले.
आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ ही नरेंद्र मोदींचं सरकार असतानाच दिली गेली -आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिक मांडताना अमित शाह म्हणाले, भाजप आरक्षण संपविणार असा भ्रम पसरवला जात आहे. आम्ही उत्तर देण्यामध्ये संकोच करू लागलो. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. मात्र आज मी सांगू इच्छितो की, आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ ही नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमताचं सरकार असतानाच दिली गेली. तसेच आरक्षणाला बळ देण्याचं कामही नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.