ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची ओळख काय तर त्यांची डायरी बघितली तर ती तुम्हाला अनेक खटल्यांनी भरलेली आढळेल असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडताना भाजपावर तोंडसुख घेतले. अमित शहांना वाचवण्याची किंमत म्हणून की काय सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना राज्यपालपद देण्यात आले अशी टीका करताना, राष्ट्रपतींना शपथ देण्याचा मान असतो त्या पदावरील व्यक्तिने राज्यपालपद स्वीकारून त्या पदाचा अवमान केल्याची टीका सदाशिवम यांच्यावर केली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते भाजपात गेल्याचा उल्लेख करताना यापुढे या लोकांची चर्चापण करू नका असे सांगताना ते गेले आणि आपण सुटलो अशी भावना पवारांनी व्यक्त केली. त्यांची पुढे खिल्ली उडवताना दसरा संमेलनामध्ये या नेत्यांना संघाची अर्धी चड्डी घालून संचलनात बघायची इच्छा असल्याचंही पवार म्हणाले. मोदी लाटेचा राज्यावर काय परिणाम होईल हे सांगताना केंद्राचा निकाल व राज्याचा निकाल एकच असतो असं नाही असं सांगतना वाजपेयी पंतप्रधान झाले त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचीच सत्ता आली होती याची आठवण पवारांनी करून दिली.
महिलांना संपत्तीत वाटा, आरक्षण, पोलीस खात्यात समावेश, वीज खात्यात लाइन वुमन अशा अनेक प्रकारे महिलांना पुढे करण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आणि सगळ्या देशाला दिशा आपण दाखवली असं पावर म्हणाले. अल्पसंख्याकांबद्दल बोलताना पवार म्हणाले की एकंदर समाजाचा विचार करता मुस्लीमांमध्ये व आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. त्यासाठी अधिक पैसा खर्च करावा लागेल, योजना आखायला लागतिल यासाठी राष्ट्रवादीच्या हातात सत्ता यायला हवी.
महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर आहे, परंतु समतोल विकास झाल्याचं समाधान नसल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. राज्यातल्या अनेक प्रांतामध्ये उद्योग नसून ते आणण्यासाठी आपल्याला सत्ता हवी असं पवार म्हणाले. कृषिक्षेत्रासाठी राष्ट्रवादीने व काँग्रेसनेच काम केल्याचं सांगताना पवार म्हणाले की अर्थपुरवठा १२ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत व काही प्रमाणात शून्य टक्क्यांपर्यंत आणण्याचं काम महाराष्ट्रानं व विशेषत: राष्ट्रवादीने केलंय.
सबंध देशातली सिंचनाखालील जमीन ४० टक्के आहे, तर महाराष्ट्रात हा आकडा अवघा १७ टक्के असल्याचं पवार म्हणाले. शेतीचं उत्पन्न आपण निश्चितच वाढवलंय, आधी आपण आयात करायचो तर आता तांदूळ, गहू, कापूस व साखरीमध्ये निर्यातीत आपण एक व दोन क्रमांकावर असल्याचं सांगताना महाराष्ट्राचं योगदान असल्याचं पवार यांनी सांगितलं. कुणी आमदार व्हावं, मंत्री व्हावं एवढा सीमित या निवडणुकांचा अर्थ नसून महाराष्ट्राची ताकद देशाच्या कामाला यायला हवी हा निवडणुका लढवण्याचा विचार असल्याचं सांगत सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं असं आवाहन पावारांनी केलं.