Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, जागावाटपाबाबत महायुतीतील (Mahayuti) पक्षांमध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. गुरुवारी(दि. 24) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी महायुतीची मोठी बैठक झाली. या बैठकीत वाद असणाऱ्या जागांवर निर्णय होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत अमित शाहांनी महायुतीतील बंडखोरांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अमित शांहासोबत बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात येतोय की, अमित शाहांची नजर महायुतीच्या बंडखोरांवर आहे. महायुतीच्या कुठल्याही पक्षाचे बंडखोर उभे राहणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मतविभाजन टाळण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकजुटीने निवडणुका लढवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीरमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्वात आधी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह अनेक दिग्गजांची नावे आहेत. याशिवाय महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील बुधवारी(दि.26) 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अजित पवारांसह पक्षाती अनेक दिग्गजांचा समावेश आहे. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेदेखील आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांबाबत दिल्लीत अंतिम निर्णय होणार आहे.
निवडणूक कधी?महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर, 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल लागेल.