मुंबई:मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते राज्यभर दौरे करत आहेत. या दौऱ्यांमधून अनेकदा अमित ठाकरे यांच्या साधेपणा दिसला आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात ते एका पदाधिकाऱ्याच्या घरात स्वतःच्या हाताने जेवणाचे ताट वाढून घेताना आणि जमिनीवर बसून जेवताना दिसत आहेत.
अमित ठाकरे यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. कधी ते मुंबई लोकलने प्रवास करताना दिसले, तर कधी एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जेवताना दिसले. आता अमित पुण्यातील एका पदाधिकाऱ्याच्या घरी जेवणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोन दिवसांपुर्वी मनसे नेते अमित ठाकरे उत्तर पुणे जिल्ह्याच्या संवाद यात्रेच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुणे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांच्या घरी जेवणासाठी आले. यावेळी अमित ठाकरे यांनी चक्क किचनमध्ये जाऊन स्वतः ताट हातात घेत जेवण वाढून घेतले.
फक्त ताटच वाढून घेतले नाही, तर जेवणासाठी चक्क जमिनीवर बसले आणि सर्वांसह सामुहिकरीत्या भोजनाचा आस्वाद घेतला. अमित ठाकरेंचा साधेपणाने जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होतोय. मनसे नेते गजाजन काळे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. "कुठलाही बडेजाव नाही, कुठला लवाजमा नाही, पाय जमिनीवर ठेवून कायम आपला साधेपणा जपणारा माझा नेता..." असं म्हणत मनसेचे नेते गजानन काळे यांनी हा व्हिडिओ शेयर केला आहे.