मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे राजकारणात सक्रिय झाले असून विधानसभा मतदारसंघनिहाय आढाव्याकरिता त्यांनी दौरा सुरु केला आहे. बुधवारी सायंकाळी अमित यांनी ग्रान्ट रोड येथे पदाधिकाऱ्यांसोबत विधानसभा निवडणूक निकालातील पराभवाचा आढावा घेतला.अमित हे आतापर्यंत मनसेच्या प्रचारात रोड शोच्या माध्यमातून भाग घेत होते. राज हे कल्याण-डोंबिवलीपासून विधानसभा निवडणूक निकालातील पक्षाच्या पराभवाचा आढावा घेणार होते. या दौऱ्यात अमित यांचा समावेश करून त्यांना सक्रिय करण्यात येणार होते. मात्र अचानक राज यांची कन्या उर्वशी हिला अपघात झाल्याने राज यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे अमित यांनी मुंबईतून आपला दौरा सुरु केला. ग्रान्ट रोड येथील बुधवारच्या बैठकीत मलबार हिल व दक्षिण मुंबईतील विधानसभा मतदारसंघातील निकालाचा आढावा घेतला गेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य हे युवा सेनेच्या माध्यमातून यापूर्वीच राजकारणात सक्रिय झाले असताना आता राज यांचे पुत्र अमित यांनीही बैठकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात पदार्पण केले आहे. (प्रतिनिधी)
अमित ठाकरे राजकारणात सक्रिय
By admin | Published: November 06, 2014 3:27 AM