नवी दिल्ली -कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचे 12वे पर्व वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या शोमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून सोशल मीडिया ते स्थानिक पातळीपर्यंत वाद सुरू झाला आहे. 'मनुस्मृती'संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरून फिल्म मेकर विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, या शोवर कम्युनिस्टांनी कब्जा केल्याचे म्हटले आहे.
फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात केबीसी 12मध्ये विचारण्यात आलेला एक प्रश्न आहे. शुक्रवारी रात्री प्रसारित झालेल्या कर्मवीर स्पेशल अॅपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी मनुस्मृतीसंदर्भात एक प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न आहे - "25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?" यासाठी चार पर्याय देण्यात आले होते - A) विष्णु पुराण B) भगवत गीता C) ऋग्वेद D) मनुस्मृती. यानंतर स्पर्धक मनुस्मृती पर्याय निवडतो आणि त्याचे उत्तर बरोबर येते.
हा व्हिडिओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे, 'केबीसीला कम्युनिस्टांनी हायजॅक केले आहे. इनोसंट मुलांनी हे शिकावे, की कल्चरल वॉर कसे जिंकावे. याला कोडिंग म्हणतात.'