जगदीश कोष्टी- सातारा रुपेरी पडद्यावरचा महानायक अमिताभ बच्चन यांना एक मानाचा पुरस्कार स्वीकारण्याचे आमंत्रण सातारकरांनी दिले आहे. हे निमंत्रण सातारी कंदी पेढ्यासह ‘बिग बी’ला पोहोचले आहे. जगाला वेड लावणाऱ्या कंदी पेढ्यांचा बच्चन यांनी कौतुकाने स्वीकार केला आहे. या पुरस्काराच्या नावाची राजघराण्यातर्फे लवकरच घोषणा केली जाणार आहे.सातारा येथील पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी आणि उदयनराजे भोसले फाउंडेशन आॅफ कल्चलर अॅक्टिव्हिटी यांच्या वतीने गेली पाच वर्षांपासून ‘सातारा गौरव’ पुरस्कार प्रदान केला जातो. छत्रपती शिवरायांचे थेट तेरावे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले यांच्यातर्फे यंदा एक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार रुपेरी पडद्यावरचा महानायक अमिताभ बच्चन यांना देण्यात येणार आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुंबईत अमिताभ बच्चन यांना निमंत्रण दिले आहे. हा सोहळा फेबु्रवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे.या संदर्भात अमिताभ बच्चन यांना पंकज चव्हाण आणि भाग्यश्री ढाणे यांनी सातारकरांचे आग्रहाचे निमंत्रण दिले. यावेळी बच्चन यांनी सातारा शहर आणि येथील राजघराण्याबाबत आदर असल्याचे आवर्जून सांगितले. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी चव्हाण यांच्यासमवेत राजघराण्याचे निमंत्रणपत्र, सुका मेवा आणि कंदी पेढे पाठविले होते. या सर्वांचा बच्चन यांनी स्वीकार केला. साक्षात बिगबी साताऱ्यात येणार असल्याने सातारकर खूष झाले आहेत.पुरस्काराला मानाचे स्थान--बाबासाहेब पुरंदरे यांना ‘शिवशाहीर’ पुरस्काराने सन्मानित केले होते. हीच परंपरा कायम ठेवत खासदार उदयनराजे भोसले यांनी अमिताभ बच्चन यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवरायांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या घराण्याकडून निमंत्रण मिळाले. याचा खूप आनंद वाटला. उदयनराजेंनाही मी ओळखतो, त्यांचेही कार्य खूप चांगले आहे.- अमिताभ बच्चन, महानायक
सातारकरांकडून अमिताभ बच्चन आमंत्रित!
By admin | Published: November 22, 2015 10:44 PM