मुंबई : देशात कोरोना व्हायरसने हातपाय पसरले आहेत. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच बॉलिवुडचे संम्राट अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या सहाय्याने कोरोना व्हायरससंदर्भात लोकांना जागरूक करताना दिसत आहे. आता त्यांनी पुन्हा एक ट्विट केले आहे. यात, अमिताभ बच्चन यांनी कोरोनाबाधितांची देखभाल करणाऱ्यांना आणि या संकटाचा सर्वांच्या पुढे येऊन सामना करणाऱ्यांना 'सामाजिक योद्धा' असे म्हटले आहे. अमिताभ यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन्सदेखील येत आहे.
अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "फ्रंट लाइन कार्यकर्ते .. डॉक्टर आणि नर्स .. सोशल वॉरियर्स .. मी नतमस्तक आहे." अमिताभ यांनी या ट्विटसोबत 'नर्स', 'डॉक्टर', 'सफाई कर्मचारी' आणि 'पोलीस' असे शब्द असलेला एक गणपतीचा फोटोही शेअर केला आहे. नुकताच एका चाहत्याने अमिताभ यांना पंतप्रधान होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर अमिताभ यांनी "अरे यार, सकाळी-सकाळी शुभ बोला," असे उत्तर दिले होते.
अमिताभ बच्चन हे लवकरच 'चेहरे', 'झुंड', 'ब्रह्मास्त्र' आणि 'गुलाबो-सिताबो' या चार बॉलिवुड चित्रपटांत झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले होते. यात ते कोचच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट सृष्टीतील इतर कलाकारही लॉकडाऊनमुळे आपापल्या घरातच आहेत. या काळात ते सोशल मीडियाच्या माध्यमाने कोरोना व्हायरससंदर्भात जनजागृती करत आहेत.