लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांनी जीएसटीचे ब्रँड अॅम्बेसेडर बनून त्याची जाहिरात करू नये, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. देशात १ जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सध्या अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या जाहिरातींचे प्रसारण सुरू आहे. जीएसटीसाठी आवश्यक तयारी झालेली नाही, याची कल्पना असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली हा कायदा रेटत आहेत. त्याचे खापर आपल्याऐवजी इतरांवर फुटावे म्हणूनच सरकारने अमिताभ यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनविण्याचा घाट घातल्याचा आरोप निरुपम यांनी सोशल मीडियाद्वारे केला आहे. सोशम मीडियात यासंदर्भात येणाऱ्या प्रतिक्रिया पाहून अमिताभ यांनी स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे. जीएसटीबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या सूचनेनुसार ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. त्यांनी जे सांगितले तेच जाहिरातीत मांडण्यात आल्याचे अमिताभ यांनी स्पष्ट केले आहे.
अमिताभ यांनी जीएसटीची जाहिरात थांबवावी
By admin | Published: June 22, 2017 5:46 AM