सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोलापूर मुक्कामी मुगाची खिचडी, ढोकळ्याबरोबरच गुजराती कडी, रसमलाई, पराठे आणि फुलक्याचा आस्वाद घेतला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भूपेंद्र यादव यांच्यासह अनेकजण रविवारी रात्री सोलापूर विश्रामधामवर मुक्कामी होते. त्यामुळे यांच्या जेवणासाठी भाजपतर्फे विश्रामधाम येथेच सोय करण्यात आली होती. शहा यांच्या जेवणातील मेनूची यादी गृहमंत्रालयाकडून मागविण्यात आली होती. त्याप्रमाणे गुजराती पद्धतीचे जेवण बनविण्याची जबाबदारी मनोज शहा, अमृता माखीजा यांच्यावर देण्यात आली होती असे भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी सांगितले. शहा यांचे रविवारी सायंकाळी सोलापुरात आगमन झाल्यानंतर विश्रामधामवर त्यांनी नाष्टा केला.
कचोरी, खमनी, भेळ, ड्रायफूट, ज्यूस असा मेनू त्यांच्यासाठी तयार होता. त्यानंतर त्यांनी चहा घेतला. सभेनंतर रात्री सव्वानऊ वाजता त्यांनी सर्वांसोबत भोजन केले. जेवणामध्ये ढोकळा, खांडवी, मटर समोसा, रसमलाई, अंजीर हलवा, मूंगला खिचडी, फुलका, पराठा, गुजराती कढी,पनीर मक्कनवाला,उंडीओ, मिक्स व्हेज मारवाडी, शाही काजू ब्रोकोली, सॅलेड, पापड,आईस्क्रीम असा मेनू होता. मुख्यमंत्र्यांचा कुक सोबत आला होता. पण त्यांनी व चंद्रकांत पाटील यांनीही गुजराती जेवणाचा आस्वाद घेणे पसंत केले.
सोमवारी सकाळी शहा यांनी नाष्टा केला. ईडली वडा, सांबर व चटणीचा त्यांनी आस्वाद घेतला. सोबत डॉलर जिलेबी, चटणी, बेसन कढी, उपमा, ब्रेड जॅम, ज्यूसचा समावेश होता. विशेष म्हणजे शहा यांच्यासाठी पुण्याहून पाण्याच्या बाटल्या मागविण्यात आल्या होत्या. जेवण जास्त तिखट बनवू नये अशी सूचना होती. केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली जेवणखानची व्यवस्था करण्यात आली होती.
सोलापुरातील चादर,टॉवेल- सभेत भाजपतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार जणांना टेरीन टॉवेल सेट व शॉल टाईप असलेली ४0 डबल चादर भेट देण्यात आली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अशी भेट देण्याची जबाबदारी चेंबर आॅफ कॉमर्सवर दिली होती अशी माहिती राजू राठी यांनी दिली. टेरीन टॉवेलचे उत्पादन दोन वर्षांपासून सुरू आहे. या सेटमध्ये एक जेन्टस व एक लेडीज टॉवेल अन् नॅपकिनचा समावेश आहे. चादरीचे वजन ६०० ग्रॅम असून, ती अत्यंत तलम आहे.