मुंबई: ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी प्रशासन विभागात अमितेश कुमार, दीपेंद्र कुशवाह, संजय मोहिते, संदीप पाटील, संजीव जयस्वाल, उज्ज्वला भागवत यांची नामांकने जाहीर झाली आहेत. या वर्षी पहिल्यांदा ‘प्रशासन’ असा विभाग करण्यात आला असून, त्यातही विभागीय आणि राज्यस्तरीय असे दोन भाग करण्यात आले आहेत. राज्याला चांगल्या अधिकाऱ्यांची परंपरा आहे. प्रत्येक जण आपल्या परिने चांगले काम करण्याचा प्रयत्न करत असतो. ‘लोकमत’च्या संपादकीय मंडळाने निवडलेली ‘प्रशासन : विभागीय’ या विभागातील नामांकने आणि त्यांची माहिती अशी :
यंदाच्या तिसऱ्या पर्वातही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयनांना प्रगतीपथावर नेणाऱ्यांमधून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर चे मानकरी ठरविण्याची प्रक्रिया लोकमतच्या संपादकीय चमूने केलेले मंथन, राज्यभरातील कोटय़वधी वाचक तसेच नामवंत ज्युरींचा कौल यातून साकारत आहे. या प्राथमिक निवडीतून अंतिम विजेते निवडण्याचा मान आहे तुमचा!
१) अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, औरंगाबादत्यांची औरंगाबादची कारकिर्द उल्लेखनीयच आहे. धडाकेबाज, शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख आहे. वर्षभराच्या कालावधीत त्यांच्या निर्णय आणि कामगिरीमुळे औरंगाबादच्या इतिहासात कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला मिळाली नाही, इतकी अफाट लोकप्रियता प्राप्त झाली आहे. दहशत निर्माण करणाऱ्या झोपडपट्टी दादांपासून ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारांपर्यंत सर्वांनाच त्यांनी ‘वठणी’वर आणले. शहरातील रस्त्यांची ‘साफसफाई’ अमितेश कुमार यांनी आपल्याच पद्धतीने केली. हेल्मेटसक्तीसाठी ते स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांच्या दालनात गेलेला आरोपी बाहेर पडताना वाल्मिकी होऊनच बाहेर येतो, असेही आता गमतीने सांगितले जाऊ लागले आहे.२) दीपेंद्र कुशवाह-संजय मोहिते, (नाशिक)बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा यशस्वीरीत्या पार पाडण्याचे मोठे आव्हान जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांनी यशस्वीपणे पार पाडले. कुंभमेळ्यातल्या चेंगराचेंगरीत २९ भाविकांच्या बळीची पार्श्वभूमी होती. त्यात साधू-महंतांच्या मिरवणुकीचा पारंपरिक मार्ग बदलण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केल्यामुळे लाखो भाविक येऊनही कुठे चेंगराचेंगरी झाली नाही, भर पावसात पार पडलेल्या पर्वण्यांमध्ये दुर्घटना घडली नाही. त्र्यंबकेश्वर अत्यंत छोटे गाव. कुशावर्त तीर्थ छोटे आहे. गावठाणातील वाड्यामुळे रुंदीकरण शक्य नसल्याने, गल्लीबोळातून साधू-महंतांची मिरवणूक आणि येणाऱ्या भाविकांचे नियोजन हे मोठे आव्हानात्मक होते. ते त्यांनी लीलया पार पाडले. भाविकांची वाहने बाह्य वाहनतळावर अडवून, केवळ एसटीद्वारेच त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश देणे विस्तारित घाटांवर भाविकांची विभागणी करणे, भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, एसटी बसगाड्यांना नियंत्रित करणे ही सर्व कामे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या अधिपत्याखाली झाली. परिणामी, लाखो भाविक येऊनही नाशिक किंवा छोटे गाव असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे कोणत्याही दुर्घटनेशिवाय कुंभमेळ्याच्या पर्वण्या यथासांग पार पडल्या. ३) संदीप पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख, गडचिरोलीयांच्या कार्यकाळात नक्षली कारवायांवर मोठे नियंत्रण आले. नक्षल आत्मसमर्पण योजनेत ५९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. १९८० पासून ५० च्या वर हा आकडा कधीही गेला नव्हता. ते आणि त्यांची टीम स्वत: नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांना भेटले. ज्या आदिवासी भागातील मुलांनी कधी गाव सोडले नाही, त्यांच्यासाठी महाराष्ट्र दर्शन सहल योजना राबविली. ११ फेऱ्या आतापर्यंत या योजनेतून पार पडल्या. जवळजवळ ८८० विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. यामध्ये नक्षल कुटुंबातील अडीचशे सदस्यांचा समावेश आहे. २०१५ या वर्षात ३० चकमकी झाल्या. २६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले. एटापल्ली तालुक्याच्या कोटमी या पोलीस ठाण्यांतर्गत २२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. ही पाटील यांच्या यशाची मोठी पावती आहे.४) संजीव जयस्वाल, मनपा आयुक्त, ठाणेरोहयोचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना पंतप्रधान पुरस्कार मिळाला. नागपूर महाापालिका क्षेत्रात चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे डिझाइन तयार करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. ठाणे महापालिकेतील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात त्यांची ठाम प्रशासकीय भूमिका महत्त्वाची, चर्चेची ठरली आहे. स्टेशन परिसरातील गर्दी कमी करण्यात घेतलेला पुढाकार, घोडबंदर रोडवरील कापूरबावडी ते गायमुख हा सात किलोमीटरचा रस्ता मार्गी लावणे, अशी कामे करताना त्यांनी पालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला. रेल्वे स्टेशन ते जांभळीनाका परिसरातील-बाजारपेठेतील डीपी रस्त्याचे ११ वर्षे रखडलेले काम हाती घेऊन त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात करून दिली. ५) उज्ज्वला भागवत, उपायुक्त, कस्टम, मुंबई‘आयआरएस’मध्ये सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साइज अँड कस्टम्स शाखेंतर्गत त्या सेवेत रूजू झाल्या. सेवा कर विभागात आपल्या कामाचा ठमा उमटविलेल्या भागवत यांची तिसरी नियुक्ती अत्यंत संवेदनशील अशा ‘कस्टम ब्रोकर सेक्शन’ येथे करण्यात आली. सेवा कराची अंमलबजावणी झाल्यानंतर त्यातील पळवाट शोधणाऱ्या व्यापाऱ्यांना चाप लागण्याच्या दृष्टीने भागवत यांनी केंद्रीय वित्तमंत्रालयाला दिलेली शिफारस मंत्रालयाने स्वीकारली आणि सेवा कर कायद्यात दुरुस्ती केली त्यामुळे कर संकलनामध्ये ३५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई सेवा कर विभागातून एक वर्षात ८०० कोटी रुपयांच्या थकीत कराची वसुली केल्याने थकलेल्या कराच्या वसुलीत देशात विक्रमी वसुली म्हणून त्यांच्या नावे नोंद आहे. (सर्व नामांकनांचा क्रम इंग्रजी आद्याक्षरानुसार)