मुंबई, दि. 14 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली भाजपा आमदार अमित साटम यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यास घाबरणाऱ्या पोलिसांविरोधात आणि मुजोर अमित साटमविरोधात आम्ही कोर्टात जाणार, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले आहे.पोलिसांविरोधात जुहू पोलीस स्थानकावर काढलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते.निरुपम पुढे म्हणाले की, जुहू पोलीस स्टेशनला आम्ही मागणी घेऊन आलो होतो की फेरीवाल्यांना मारहाण करणारे आणि महिलेचा विनयभंग करणारे भाजपाचे आमदार अमित साटम यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी. या घटनेचा व्हिडीओ पण व्हायरल झाला आहे. पण पोलिसांनी सत्तारूढ भाजपा आणि स्वयं मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली फक्त NC केली आहे, तक्रार लिहून घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेची तक्रार लिहून घेऊन 24 तासांच्या आत त्या व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी. पण अजूनही आमदार अमित साटमविरोधात कोणतीही तक्रार (FIR) दाखल करण्यात आलेली नाही. याचा अर्थ असा होतो की, पोलीस भयंकर दबावाखाली आहेत.
मुख्यमंत्र्यांना भीतीने कारवाई करत नाहीत आणि अशा गुंडगिरी करणाऱ्या आमदारांसमोर पोलिसांनी शरणागती पत्करली आहे. अशा वेळी आमच्या समोर एकच पर्याय उरला आहे. आम्ही मुजोर आमदार अमित साटम आणि त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. या मोर्चामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते आणि फेरीवाले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.