मुंबई - विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडणार आहे. भाजपाकडून निवडणूक लढविणारे उदयनराजे भोसले पोटनिवडणुकीत 2 लाख मतांनी पराभूत होणार असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मोदी-शहा कोणीही आले तरी उदयनराजेंचा पराभव निश्चित आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता खासदार अमोल कोल्हेंनीही उदयनराजेंचा पराभव होईल, असे म्हटले आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना आघाडीकडून उभे करण्यात येणार होते. मात्र पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे साताऱ्याता श्रीनिवास पाटील विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना रंगत आहे. उदयनराजेंनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतरही साताऱ्यात शरद पवारांच्या सभेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. साताऱ्यातील नागरिकांनी पवार यांच्यावरील प्रेम त्यांच्या सातारा दौऱ्यातून दाखवून दिले होते. त्यामुळे साताऱ्यातील लढत लोकसभा निवडणुकीएवढी सोपी राहिली नाही.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक अमोल कोल्हेंनी साताऱ्यात भाषण करताना, उदयनराजेंना आमचा विरोध नसून भाजपाला विरोध असल्याचे म्हटले. देशातील तरुणांच्या रोजगाराच कचरा झालाय त्याचं काय, बेरोजगारीचं काय, असा प्रश्न अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला. तसेच, उदयनमहाराज हा माणूस चांगलाय, त्यांना विरोध असण्याचं कारणच नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. महाराजांना आमचा विरोध नाही, पण भाजपा आम्ही स्विकारणार नाही ही वेळ आलीय. साताऱ्यातील जनतेचा एक नूर आहे, साताऱ्यातील तरुण म्हणतात. आमच्या मनात अजूनही मान गादीलाय, पण मत राष्ट्रवादीलाय, असे म्हणत अमोल कोल्हेंनी उदयनराजेंचा पराभव होईल, असे भाकित केले. दरम्यान, सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीकडे देशाचे लक्ष्य लागले आहे.
कोण आहेत श्रीनिवास पाटील?श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे महाविद्यालयीन काळातील जिवलग मित्र आहेत. या दोघांचे शिक्षण पुण्यात झाले. श्रीनिवास पाटील पुढे सनदी अधिकारी झाले. पवारांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या पाटील यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला. १९९९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कराड मतदारसंघातून पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. तसेच २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही पाटील सलग दुसऱ्यांदा लोकसभेत निवडून गेले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या काळात श्रीनिवास पाटील यांना सिक्कीम राज्याचे राज्यपाल म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. आता वयाच्या ७९ व्या वर्षी ते लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.