“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 02:25 PM2024-05-06T14:25:57+5:302024-05-06T14:26:07+5:30
Amol Kolhe News: महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे दिसते आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
Amol Kolhe News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे लोकसभा निवडणूक रिंगणात असून, त्यांच्याविरोधात अजित पवार गटाने शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अमोल कोल्हे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि अन्य केंद्रीय नेत्यांना यावे लागतेय, यावरूनच महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसत आहे, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला.
कांदाप्रश्नी बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितले की, कांदा निर्यात बंदी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे. प्रत्येक मेट्रिक टनावर ५५० डॉलर हा चार्ज तर ४० टक्के निर्यात शुल्क लावली गेली आहे. हे सर्व तसेच वाहतूक खर्च जोडता जागतिक बाजारपेठेमध्ये कांद्याचा दर हा ६५ ते ७० रुपये इतका होईल. ही निर्यात बंदी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे, या शब्दांत अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले.
शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढण्यास तयार होतील
शरद पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बैठका, कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना, उन्हाचा तडका वाढल्याने उन्हाचा त्रास प्रत्येकाला जाणवतो. आवाजाचा त्रास झाल्याचा मला समजले. तीन ते चार सभा एकाच दिवशी महाराष्ट्रभर घेत आहेत. त्यामुळे एक दिवसाचा आराम झाला की, पवार साहेब पुन्हा त्याच ऊर्जेने व ताकदीने महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी तयार होतील, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्रातील एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार दोन फोडलेले पक्ष त्यांची चोरलेले नेते एवढे सर्व असताना पंतप्रधान आणि केंद्रातील नेत्यांना यावे लागते आहे. यावरून महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे दिसून येते त्यामुळे एवढे धावाधाव करावी लागते. महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे, अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली.