MP Amol Kolhe : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. अनेकदा तर ते भाजपमध्ये प्रवेस करणार असल्याच्या चर्चा येत राहतात. पण, अमोल कोल्हेंकडून याबाबत कुठलीही ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान, आज जागतिक पुस्तकदिनी कोल्हे यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
आज(23 एप्रिल) हा दिवस जगभरात 'जागतिक पुस्तक दिन' म्हणून साजरा केला जातो. याच दिनानिमित्त खासदार अमोल कोल्हे यांनी एक फोटो शेअर केला आहे. तसेच, एक कॅप्शनही दिले आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भाषण संग्रहाचे पुस्तक 'नेमकची बोलणे' दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत 'द न्यू बीजेपी' नावाचे पुस्तक दिसत आहे.
या फोटोसोबत 'विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?' असे कॅप्शनही अमोल कोल्हे यांनी या पोस्टला दिले आहे. हे फोटो शेअर करण्याचा त्यांचा नेमका काय हेतू आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी 2024 ला मी शरद पवार यांच्यासोबतच असणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.