सातारा : खासदार उदयन राजे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसे सुतोवाच उदयनराजेंनी स्पष्टपणे दिलेले नसले तरीही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उदयन राजे लवकरच प्रवेश करतील असे सांगितले आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली असून खासदार अमोल कोल्हे यांनी आज उदयनराजेंची भेट घेत मन वळविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
भाजपामध्ये सध्या राष्ट्रवादीतून जोरदार पक्षांतर सुरु आहे. कालच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. याचबरोबर अन्य दोन नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अजित पवार यांचे अत्यंत जवळचे नातेवाईकही आहेत. याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंच्या भाजपप्रवेशाची घोषणा केल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपप्रवेशाबाबत उदयनराजेंनी कधीही खुलेपणे सांगितलेले नाही. मात्र, अमोल कोल्हे यांनी आज त्यांची भेट घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये साताऱ्यातील जिल्हा शासकीय विश्राम गृहात अर्धा तास कमरा बंद चर्चा झाली. मात्र,खासदार कोल्हे यांनी केलेली ही मनधरणी अखेर निष्फळ ठरली.यानंतर कोल्हेना निरोप देण्यासाठी उदयनराजे बाहेर आले असता पत्रकारांनी त्यांना या भेटीविषयी विचारले. यावेळी उदयनराजेंनी कोल्हेंची मी पृथ्वीवर राहण्याची इच्छा असल्याचे मिश्किलपणे सांगितले.
यानंतर उदयनराजेंचे मन वळविण्यात यश आले का असे विचारले असता अमोल कोल्हेंनीही हसत उत्तर दिले. मावळा छत्रपतींचे मन वळवू शकतो का, असा प्रश्न केला. तसेच महाराजांनी आपल्यासोबत रहावे अशी सर्वांची इच्छा आहे मात्र, ज्या व्यक्ती स्वयंभू असतात त्यांचे तेच निर्णय घेतात. त्यांना शुभेच्छा असे कोल्हे म्हणाले.
राजेंनी मावळ्याचं मन वळवले आहे का असे छेडले असता उदयनराजे यांनी या विषयी ते माझे मित्र आहेत. प्रत्येक विषय हा त्या हेतूने पाहू नका. राजकारण राजकारण करून गजकरण व्हायचं असे म्हटले.
शिवस्वराज्य यात्रेकडे पाठ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होता. अकराव्यादिवशी ही यात्रा सातारा जिल्ह्यात पोहोचली होती. मात्र, उदयनराजे या यात्रेकडे फिरकलेच नव्हते.