मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आला. या यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा काढला आहे. तर भाजपने देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढली आहे. परंतु, सोशल मीडियावर नुकतीच घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचीच अधिक चर्चा दिसत आहे.
शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात त्यांनी लोकसभा निवडणुकीत सेनेला मतदार करणाऱ्या जनतेचे आभार मानण्यास सुरुवात केली आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत सेनेला मतदान करावे, असे आवाहन करणार आहेत. परंतु, आदित्य यांनी एका कार्यक्रमात ही यात्रा राजकीय नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या यात्रेविषयी शिवसेनाच गोंधळात आहे, का असा प्रश्न उपस्थित होते. आदित्य यांनी गेल्या महिन्यातच या यात्रेला सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला.
आदित्य ठाकरे यांच्या यात्रेपाठोपाठ, भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात महाजनादेश अर्थात जनतेचा सर्वात मोठा कौल या आशयाखाली यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ हजारहून अधिक किलोमीटर प्रवास करणार आहेत. या यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४,३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सुरू होण्याच्या एक दिवसआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शिवस्वराज्य यात्रेची घोषणा केली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली असून छत्रपती उदयनराजे भोसले या यात्रेत स्टार प्रचारक असणार आहे. डॉ. कोल्हे छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर परिचीत आहेत. तर उदयनराजे यांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्यामुळे ही यात्रा चांगलीच गाजणार अशी शक्यता आहे.
सोशल मीडियावर सध्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश, आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिवस्वराज्य यात्रेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या चर्चेत सध्यातरी शिवस्वराज्य यात्राच सर्वाधिक चर्चेत आहे. नेटकऱ्यांची पसंती, डॉ. अमोल कोल्हे आणि उदयनराजे यांच्या यात्रेला अधिक दिसत आहे. युवकांमध्ये दोन्ही नेत्यांविषयी असलेली क्रेझ यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा यशस्वी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा दुसऱ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.