मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांना रोखण्यासाठी राज्यात यात्रा काढण्यात आल्या आहेत. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा तर शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जनआशीर्वाद यात्रा काढली. या यात्रांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा राज्यात सुसाट सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झाल्यामुळे महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. परंतु, अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा मजलदरजल करत आज औरंगाबाद जिल्ह्यात दाखल होणार आहे.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज अकोला, बाळापूर, शेगाव, नांदुरा, मलकापूर आणि जामनेर येथे पोहोचणार होती. या दरम्यान मुख्यमंत्री तीन जाहीर सभांना संबोधीत करणार होते. परंतु, सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी यात्रा स्थगित केली. तसेच मुंबईत दाखल होऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केला. राज्यात पुरस्थिती असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.
दुसरीकडे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा नियोजित वेळेनुसार सुरू आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या आजच्या अहमदनगर आणि शेवगाव येथी दोन्ही सभा पार पडल्या असून तिसरी सभा गंगापूर येथे ५ वाजता होणार आहे.