अकोला – राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर अकोल्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर आला. आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील वाद उफाळून आला. अकोला इथं पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी शिवा मोहोड यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होताच आमदार अमोल मिटकरी संतापले. व्यासपीठावरच त्यांनी मोहोड यांच्या निवडीला विरोध करत मंत्र्यांसमोरच या घटनेचा निषेध केला.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, जोपर्यंत विश्वासात घेतले जाणार नाही तोपर्यंत हे जे नाव घेतलं मोहोडचे, त्याचं मी निषेध करतो. मी अजितदादांकडे या व्यक्तीविरोधात तक्रार केली आहे. या निवडीला माझा निषेध आहे. अजितदादांनी हा पक्षप्रवेश केला नाही. माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे. तर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शिवा मोहोड यांना अजितदादांनी पक्षप्रवेश दिला असल्याचे सांगितले. त्यावर खोटे बोलू नका, माझा या पक्षप्रवेशाला विरोध आहे असं प्रत्युत्तर मिटकरी यांनी दिले.
त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी वादात मध्यस्थी करत सगळ्या निवडी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मान्यतेने मुंबईत होतील. इथे एकही निवड होणार नाही. जर अशाप्रकारे वाद करायचे असतील तर तुम्ही बाहेरच्यांना कशाला बोलवता? तुम्हीच भांडणे करत बसा, असे चालत नाही. संघटनेची शिस्त तुम्ही सर्वांनी पाळली पाहिजे असं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शिवा मोहोड आणि अमोल मिटकरी वाद काय आहे?
अमोल मिटकरी हे निधी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतात असा आरोप तत्कालीन राष्ट्रवादी युवक काँग्रेस अकोला जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी केला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर हा आरोप केल्यानंतर माध्यमांत चांगलीच चर्चा झाली. मिटकरींवर केलेले आरोप गंभीर असल्याने विरोधी पक्षांनी अमोल मिटकरींवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर समाजात प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी ५ कोटींचा मानहानीचा दावा मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर केला. तशी नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र त्या नोटिसीवर ‘मैं झुकेगा नहीं’, असा पलटवार मोहोड यांनी केला होता.