Ajit Pawar Rohit Pawar Amol Mitkari: 'थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर?', असं विधान अजित पवारांनीरोहित पवारांची भेट झाल्यानंतर केलं. त्यांच्या विधानावर राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली, तर रोहित पवारांनी ते बारामतीत अडकून पडले होते, असं म्हटलं. रोहित पवारांच्या या विधानावर अमोल मिटकरींना संतप्त प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांना खोटारडा म्हणत त्यांनी उत्तर दिलं.
कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रीतीसंगमावरील यशवंतरावांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी आमदार रोहित पवार यांची त्यांच्याशी भेट झाली. भेट होताच रोहित पवार अजितदादांच्या पाया पडले. त्यावेळी 'थोडक्यात वाचलास माझी सभा झाली तर?', असं मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलं. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अमोल मिटकरींनी टीका केली.
अमोल मिटकरी रोहित पवारांना काय बोलले?
"स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा किती खोटा बोलतोय. बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन आज मस्तीत बोलतोय. जय, पार्थदादापैकी कुणी एक जरी कर्जत जामखेडमध्ये फिरला असता, तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. खोटारडा", असे अमोल मिटकरी म्हणाले.
रोहित पवार नेमकं काय बोलले होते?
अजित पवारांची सभा झाली असती तर? या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणालेले की, "झाली असती, तर वर-खाली झालं असतं. उलटंही होऊ शकलं असतं. पण, बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते की, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. पण, शेवटी ते मोठे नेते आहेत. निर्णय त्यांचा होता. बाकी आज सगळ्यात जास्त आमदार त्यांचे निवडून आले आहेत. चांगली गोष्ट आहे. मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे."