मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा (Mansoon Session) पाचवा दिवस आहे. सकाळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात 'पन्नास खोके एकदम ओक्के...' अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे सत्ताधारी आक्रमक झाले, यावेळी आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले खडसे?
विरोधकांकडून 'पन्नास खोके एकदम ओक्के...' या घोषणेनंतर सत्ताधारी आमदारांनी 'लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के', 'वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के', अशा घोषणा सुरू केल्या. यावेळी महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'आज अधिवेशनादरम्यान धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पण, विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे. एकोंमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे हे काय योग्य नाही. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हायला हवे,' असे खडसे म्हणाले.
विधीमंडळित नेमकं काय झालं?विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. तर, सत्ताधारी पक्षाचे आमदारही राष्ट्रवादी-शिवसेनेविरोधात नारेबाजी करत होते. अधिवेशनापूर्वी शिंदे गटाचे आमदार पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असताना विरोधकही तेथे उपस्थित झाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राडा झाला. या गोंधळात शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र इतर आमदारांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.