मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर बोचरी टीका करत त्यांची गुलाबी सरडा असा उल्लेख केला. राऊतांच्या या टीकेवर संतापलेल्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संजय राऊतांना दुतोंडी सापाची उपमा दिली आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, ज्या व्यक्तीचा नरडाच सकाळपासून दुसऱ्यावर तोंडसुख घ्यायला वळवळत असेल त्याच्या नरड्यातून सरडा शब्द आला असेल तर त्यात गैर वाटण्याचं कारण नाही. अजितदादांबद्दल त्यांनी जे वक्तव्य केले असेल तर जबानीचा पट्टा चालवणाऱ्यांचा बंदोबस्त राष्ट्रवादीला करता येतो. दुतोंडी सापाने दुसऱ्याकडे तोंड दाखवण्यापेक्षा स्वत:च्या तोंडाकडे पाहावे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडले. पवार कुटुंब फोडले त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या भावा बहिणीच्या नात्यावर बोलताना स्वत:च्या अस्तित्वावर बोलावे. राऊतांसारखा घरभेदी एकदिवस उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवणार हे नक्की. रंगावरून जर ते बोलत असतील तर पन्हाळ्याच्या खंडोबावर गुलालाची उधळण होते. संजय राऊत निवडून आले तेव्हा गुलाल उधळला असेल. पौराणिक साहित्यात गुलाब, गुलाल आणि गुलाबी रंग फार पूज्यनीय मानला जातो. त्यामुळे एकीकडे हिंदू धर्माचा उर बडवायचा आणि दुसरीकडे हिंदू देवीदेवतांची टिंगळ करायची असं करू नका. लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीच्या पोटात दुखायला लागलं आहे. राऊतांशिवाय त्यांच्याकडे कुणी बोलणारं नाही त्यामुळे राऊतांनी त्यांच्या तोंडाचा पट्टा चालवला. जेव्हा आम्ही बोलायला लागू तेव्हा गुलाबी रंग आणि लाल रंग कसा असतो हे दाखवून देऊ असंही अमोल मिटकरींनी इशारा दिला.
काय म्हणाले होते संजय राऊत?
सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे, या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला. या बहिणीसाठी बारामतीत महाराष्ट्र लढला आहे. तुमचे जे लाडके भाऊ आहेत त्यांनी रंग बदलला. ते आता पिंक झालेत. सरडा रंग बदलतो पण अचानक गुलाबी कसा होऊ शकतो. आता हा गुलाबी सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलं आहे. कुठे जाणार हे माहिती नाही. परंतु गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिणा नाही. आपला रंग भगवा आहे असं सांगत संजय राऊतांनी अजित पवारांवर निशाणा साधला. तसेच बाजूच्या तेलंगणा राज्यात केसीआर यांचा गुलाबी रंग होता ते पराभूत झाले. पिंक कधीही राजकारणात जिंकत नाही. एकतर भगवा रंग जिंकतो किंवा तिरंगा..तिरंग्याच्या रक्षणाला भगवा रंग आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे, तिरंग्याचे रक्षण जर कुणी करेल तर तो भगवा. आम्ही हे रक्षण करतोय. त्यामुळे पिंकची काळजी नाही तो रंग आता गेला. आता आपल्याला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी...मशाल बुडाला आग लावायला आहेच असंही संजय राऊतांनी म्हणत अजितदादांवर नाव न घेता घणाघात केला.