NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. यातच अवघ्या देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर आहेत. मतदान सुरू झाल्यापासून बारामतीत वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे या अचानक अजित पवार यांच्या घरी गेल्या. यावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यासंदर्भात अमोल मिटकरींनीसुप्रिया सुळे यांना थेट सवाल केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या काटेवाडीमधील घरी जाऊन अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे या अजितदादांच्या गेल्या, तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार घरात नव्हत्या, असे सांगितले जात आहे. काकींना भेटण्यासाठी आले होते. त्यांचा आशिर्वाद घ्यायला आले होते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली.
संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?
सुप्रियाताई आत्ताच दादांच्या आई म्हणजे आशाताई पवार यांना काटेवाडी या त्यांच्या गावी भेटायला गेल्याची बातमी प्रसारमाध्यमांद्वारे कळली. निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या दीड महिन्यापासुन आशाताई बारामती परिसरातच आहेत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का? आणि दीड महिन्यात एकदाही चरणस्पर्श करण्याची वेळ आदरणीय ताईंना का मिळाली नसावी? तरीही महाराष्ट्राची संस्कृती जपल्याबद्दल ताई आपले आभार आणि आशाताईंसोबत सेल्फी न घेतल्याबद्दलही मनस्वी आभार, असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे राहिल्याने या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच सर्व पवार कुटुंबीयांनी बारामतीत मतदानाचा हक्क बजावला.