राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाच्या चर्चांसाठी चाचपणी सुरु झाली आहे. तिन्ही पक्ष कोणत्या जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि कोणत्या सोडायच्या यावर मोर्चेबांधणी करत आहेत. असे असताना तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी आपापल्या इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याकडेही अनेक इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
लोकसभेसाठी १६-१६-१६ चा फॉर्म्युला ठरला? राऊतांनी वेगळाच आकडा सांगितला...
मविआमध्ये ४८ जागा तीन पक्षांत समान वाटण्याचा फॉर्म्य़ुला ठरल्याचे वृत्त पसरले होते. काही वेळापूर्वी राऊतांनी ते खोटे असल्याचे सांगितले आहे. तसेच शिवसेनेचे लोकसभेत १९ खासदार असल्याचे म्हटले आहे. यामुळे जागावाटपावरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरु झाल्याचे हे संकेत आहेत. शिवसेनेने जर १८ खासदार महाराष्ट्रातून निवडून येणार असा दावा राऊतांनी केल्याने ठाकरे गट किती जागा लढविणार असा प्रश्न उभा राहिला आहे.
असे असताना अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अकोल्याची जागा जर राष्ट्रवादीकडे आली तर मी त्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे, असे वक्तव्य मिटकरींनी केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी तसे ट्विटही केले होते.
मिटकरी यांनी यावेळी परमबीर सिहांच्या नोकरी बहालीवरून भाजपावर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारवर १०० कोटींचा आरोप करून बदमान केले गेले, त्या परमबीर यांना भाजपाने नोकरीच्या सेवा पुन्हा बहाल केल्या. परमबीर त्यांनी केलेले आरोपही सिद्ध करू शकले नाहीत. भाजपाचे ते एजंट होते. रश्मी शुक्ला यांना भाजपाने महाराष्ट्रभूषण जाहीर केला तरी काही वाटणार नाही, तसाच परमबीर यांना देखील करावा, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे. परमबीर यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अकोल्यातही त्यांच्यावर एफआयआर दाखल आहे, असे मिटकरी म्हणाले.