शिक्षा मंडळ शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ : राष्ट्रपतींची बजाज विज्ञान केंद्र आणि बापूकुटीला भेटवर्धा : गुणवत्ताभिमुख शिक्षण प्रणालीत स्थित्यंतर घडवून आणण्याची मोठी शक्ती आहे. यानुरुप शैक्षणिक प्रणालीत बदल केल्यास जगातील अग्रणी देशांमध्ये भारताचा समावेश होऊ शकेल, असा आशावाद राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.वर्धा शिक्षा मंडळाच्या शताब्दी समारोहाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, शिक्षा मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, नारायण जाजू, मधुर बजाज, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, संजय भार्गव उपस्थित होते.व्यक्तीचा सर्वांगीण विकास आणि समानता आणण्याचे साधन म्हणून शिक्षणाचा उपयोग करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, स्वच्छ भारत आणि स्वच्छ विद्यालय ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि स्वच्छ पर्यावरणासाठी महात्मा गांधींपासून प्रेरणा घ्यायला हवी. देशातील नव्या शिक्षण संकल्पनेचा अर्थात नई तालीमचा उगम गांधीजींच्या अध्यक्षतेखाली शिक्षा मंडळामध्ये १९३७ मध्ये झालेल्या पहिल्या शिक्षण संमेलनात झाला. शिक्षा मंडळाने अत्यल्प दरात दर्जेदार शिक्षण दिले आहे. इतर संस्थांनी याचे अनुकरण केले तर देशातील शिक्षण क्षेत्राचा कायापालट होईल. ते पुढे म्हणाले, गांधीजी, जमनालाल बजाज यांच्या वास्तव्याने पावन झालेले वर्धा हे केवळ एक भौगोलिक स्थान नसून कल्पना, साधेपणा आणि बांधिलकी यांचे प्रेरणास्त्रोत म्हणून वर्धा महत्त्वपूर्ण आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांना स्वायतत्ता - देवेंद्र फडणवीसअल्पदरात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्था महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अशा संस्थांना स्वायत्तता देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या नियमांमध्ये लवचिकता आणण्यासोबतच कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून रोजगारक्षम मनुष्यबळ निर्मिती करणारे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षा मंडळाच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाला येत्या १५ दिवसात मान्यता देण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नारायण जाजू यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सत्कार केला. प्रारंभी शिक्षा मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी १०० वर्षातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना ग्रामीण व गरजूंना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी - नितीन गडकरी२१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. या क्षेत्रात ४ कोटी ७० लाख रोजगार उपलब्ध आहे. युवकांनी या क्षेत्रात येण्याची गरज आहे. यासाठी तयार व्हावे लागणार आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यात वर्धा जिल्ह्याचाही समावेश आहे. याप्रसंगी राष्ट्रपती मुखर्जी यांना राहुल बजाज यांनी महात्मा गांधी यांची प्रतिमा देऊन गौरविले. तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही महात्मा गांधी यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले.शिक्षा मंडळाचे सरचिटणीस संजय भार्गव यांनी संचालन करून आभार मानले. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावार तसेच लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ गांधीवादी, शिक्षा मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनी साधला मोकळा संवादराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बजाज विज्ञान केंद्राला भेट दिली. यावेळी सातवी, आठवीतील विद्यार्थ्यांनी सहजपणे अत्यंत मोजक्या आणि प्रभावी शब्दात विज्ञान प्रकल्पाची माहिती त्यांना दिली. यावेळी राष्ट्रपतींनीही विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद साधला आणि त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्यात. प्रार्थना सभेस उपस्थितीशिक्षा मंडळाचा समारोह आटोपताच राष्ट्रपतींनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. यावेळी बापूकुटीतील प्रार्थना सभेसही ते उपस्थित होते. यानंतर आश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर मंडळींसह आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर व आश्रमातील मंडळी उपस्थित होती.
तर भारताचा अग्रणी देशांमध्ये समावेश - मुखर्जी
By admin | Published: November 27, 2014 12:24 AM