मुंबई : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच लढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोल्यात स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेकडून लढण्याच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या आशेवर पाणी फिरले. २०१९ मध्ये नवनीत राणा अपक्ष विजयी झाल्या होत्या. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर राणा भाजपसोबत राहिल्या. आता त्या भाजपच्या उमेदवार असतील अशी चर्चा असताना अमरावतीत शिवसेनाच लढणार असा दावा अडसूळ यांनी केला होता. अडसूळ पिता-पुत्र शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, अमरावती मतदारसंघ भाजपच लढणार आहे. जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा यांना उमेदवारी द्यायची की नाही याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व करेल.
महाविकास आघाडीत पेच अमरावतीच्या जागेवरून महाविकास आघाडीत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. काँग्रेस आणि शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही जागा मागितल्याने पेच कायम आहे.
रामटेकचा पेच कायमरामटेकची जागा शिवसेनेने भाजपसाठी सोडावी अशी विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री शिंदे यांना केलेली होती. शिंदे समर्थक कृपाल तुमाने (शिवसेना) हे रामटेकचे विद्यमान खासदार आहेत. ही जागा आपणच लढावी असा स्थानिक भाजप नेते, पदाधिकाऱ्यांचा पक्षावर दबाव आहे. मात्र दोघांपैकी कोणता पक्ष लढणार हा पेच अद्यापकायम आहे.