अमरावती : मिनी मंत्रालयावर ताबा मिळविण्यासाठी भाजपाने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा भाजपाची उंची वाढविण्यासाठी उपयुक्त ठरली असली तरी सत्ता स्थापनेचा आकडा गाठू शकली नाही. ५९ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेस पक्षाने एकूण २६ गटांमध्ये विजय संपादन केला. सहकारी पक्षांच्या मदतीने सत्ता काँग्रेसचीच असेल. २०१२च्या निवडणुकीत काँग्रेसचे २५ उमेदवार निवडून आले होते. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचा चेहरा असलेले आमदार वीरेंद्र जगताप आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवून दिले. या नेत्यांची मतदारसंघातील पकड चर्चेचा विषय ठरली.जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन प्रचारसभा झाल्या. अमरावती मुख्यमंत्र्यांच्या मामांचा गाव असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अमरावती जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी धुव्वांधार प्रचार केला. नगरपालिका, पदवीधर मतदारसंघ या निवडणुकांमधील घवघवीत यशानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेतील सदस्यसंख्या वाढविण्यासाठी चंग बांधला होता. यापूर्वीच्या निवडणुकीत असलेला ९ सदस्यांचा आकडा १३ वर पोहोचू शकला. तूर आणि सोयाबीन या जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांना अत्यल्प भाव आहे. शेतकरी त्यामुळे भाजपावर कमालीचा नाराज आहे. ग्रामीण भागातील भाजपाचा विजयरथ याच कारणामुळे रोखला गेला. शिवसेनेला ग्रामीण भागात फटका बसला. सदस्यसंख्या ७ वरून ३पर्यंत घसरली. राकाँला दोन जागांवर नुकसान झाले. (प्रतिनिधी)
( BMC ELECTION RESULTS : 690 कोटींची संपत्ती असलेल्या पराग शहांचा विजय )
अमरावतीपक्षजागाभाजपा१३शिवसेना०३काँग्रेस२६राष्ट्रवादी०५इतर१२