ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 6 - विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन अमरावती जिल्ह्यात चांगलेच चिघळले असून आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या घरांना "टार्गेट" केले. जिल्हाधिकारी अभिजित बांगर व विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करीत भाजीपाला फेकला. आंदोलकांनी पुकारलेले ‘टाळे लावा’ आंदोलन यशस्वी ठरले आहे. दरम्यान, आंदोलक शेतकरी मोबाईल टावरचे नुकसान करू शकतात, अशी माहिती आंदोलक एकमेकांना देत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी अमरावती येथील शासकीय अधिकाऱ्यांच्या घरासमोर निदर्शने केली. स्थानिक तहसील कार्यालयात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाळे लावण्याचा प्रयत्न केला, मात्र चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कार्यकर्ते व पोलीस यांच्यात चांगलीच धक्काबुक्की झाली. ‘आप’ने जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करीत मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाला टाळे लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही. ग्रामीण भागातही आंदोलनाला विविध संघटनांचा चांगला पाठिंबा लाभत आहे. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांदूरबाजार तहसील कार्यालयाला टाळे लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस बंदोबस्त चोख असल्यामुळे त्यांनी आपला विचार बदलून तालुक्यातील तलाठी कार्यालयांना टाळे लावले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पथ्रोट येथे युवक शेतकरी पुत्रांनी मुंडन करून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. भातकुली तालुक्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चक्का जाम करण्यात आला, आंदोलकांनी टमाटे रस्त्यावर फेकले. वाढोणा रामनाथ येथे आंदोलकांनी आठवडी बाजार भरू दिला नाही. पुसदा येथे रास्ता रोको करण्यात आला. शेंदूरजनाघाट येथे शेतकऱ्यांच्या संपला पाठिंबा देण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान तुरीच्या मुद्दयावरून आंदोलन तीव्र होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
अमरावतीत आंदोलन चिघळले; अधिकाऱ्यांची घरे "टार्गेट"
By admin | Published: June 06, 2017 10:35 PM