मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना मोठा धक्का बसला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात गेले होते. अडसूळांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला.
२०१३ मध्ये नवनीत कौर यांचा विवाह रवी राणा यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवलं. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला.आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज त्यावर निकाल सुनावण्यात आला. बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं कौर यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. याशिवाय त्यांना २ लाखांचा दंडदेखील ठोठावला. २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली, तेच प्रमाणपत्र आता रद्द झाल्यानं राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे....तर राणा तुरुंगात जातील- अडसूळमुंबई उच्च न्यायालयानं राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. त्यामुळे राणा यांच्याच शब्दांत सांगायचं झाल्यास दूध का दूध आणि पानी का पानी झालं आहे, असा टोला शिवसेना नेते अडसूळ यांनी लगावला. राणा यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. घटनेच्या चौकटीत हा फार मोठा गुन्हा आहे. यामुळे राणा यांना तुरुंगावासदेखील घडू शकतो. त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असं अडसूळ म्हणाले.