वेळ पडल्यास ईडी किंवा सीबीआयकडे जाणार पण अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणा यांच्या या धमकीवजा इशाऱ्याच्या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आरती सिंह यांनी भ्रष्टाचार केला, खोटे गुन्हे दाखल केलेत असा आरोपही त्यांनी केला आहे.
"अमरावतीमध्ये आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट त्या करत आहेत. याआधी त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी काम केलंय त्या-त्या ठिकाणी असाच भ्रष्टाचार केला आहे. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देईन", असं रवी राणा म्हणाले. तसंच अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे, त्या विरोधात मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वोच्च न्यायालय तसेच ईडी किंवा सीबीआयकडे जाईन पण आरती सिंह यांना तुरुंगात टाकणारच, असा रोखठोक इशाराच रवी राणा यांनी दिला आहे.
अमरावतीत महापालिका आयुक्तांवर गेल्या महिन्यात शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी राणा यांना कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. दुसरीकडे रवी राणा यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांनीही जोरदार टीका केली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह आणि महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडून माझ्या विशेष अधिकाराचे हनन करण्यात आल्याचा आरोप करीत करीत खासदार नवनीत राणा यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलेल्या निवेदनातून शरसंधान साधले आहे.
अमरावतीच्या राजकीय वर्तुळात सध्या हा विषयाची जोरदार चर्चा आहे. तसेच पोलीस आयुक्तांच्या बेहिशेबी संपत्तीची ईडी, सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.