अमरावती - कॅन्सरच्या उपचारासाठी लागणा-या औषधी तयार करण्याच्या नावावर अमरावतीतील एका कापड व्यापा-याची नायजेरीयन टोळीने ६७ लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणात सायबर सेलने नायजेरीयन टोळीतील एका महिलेसह तीन जणांना मुंबईत अटक केली होती. त्या टोळीने ज्या तीन इसमांच्या बँक खात्यात रोख वळती केली होती. त्यांना मुंबई पोलिसांनी दुसºया एका प्रकरणात अटक केली आहे. सद्यस्थितीत ते तीन आरोपी मुंबईतील आॅथररोड जेलमध्ये असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी अमरावती पोलीस मुंबईला रवाना झाले आहे.
सोशल मीडियाचा वापर करून एका महिलेने अमरावतीमधील कैलास शिवप्रसाद तिवारी यांच्याशी संपर्क केला. तिने तिच्या नायजेरीयन साथीदारांच्या मदतीने अकीगबरा नावाच्या औषधी बियांच्या विक्री व्यवसायात पैसे गुंतविण्याचे आमीष तिवारींना दाखविले. त्यानुसार तिवारी यांनी ६७ लाखांची रोख नायजेरीयन टोळीच्या बँक खात्यात जमा केली. कैलास तिवारी यांनी या घटनेची तक्रार २१ मे २०१७ रोजी राजापेठ ठाण्यात नोंदविली. त्यानुसार चौकशी करून नायजेरियन टोळीतील माईक केविन फिलीप ऊर्फ बोबो ऊर्फ डॉ. कॉसमॉस (३३,रा. खारघर नवी मुंबई), एमेका फेवर इफेसेनाची (३०) आणि सुकेशिनी संतोष धोटे ऊर्फ स्नेहा पांडुरंग देरकर ऊर्फ आदिती शर्मा (२६,दोन्ही रा. तळोजा फेज १, नवी मुंबई) या तीन आरोपींना अटक केली. त्यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्यात आली होती.
या नायजेरीयन टोळीने फसवणुकीची रोख त्यांच्या साथीदारांच्या बँक खात्यात वळती केल्याचे चौकशीत समोर आले. दरम्यान मुंबई येथील सायबर क्राईमच्या पोलिसांनी मंगल मानसिंग बिष्णोयी, समीर अन्वर मर्चन्ट व जितेंद्र मगन राठोड (सर्व रा. मुंबई) यांना काही दिवसांपूर्वीच अटक केली. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगीही करण्यात आली. सद्यस्थितीत ते अर्थोरोड जेलमध्ये आहेत. त्यांना आता अमरावती पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक व गुन्हे शाखेचे प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात एपीआय देसाई, पोलीस शिपाई राजेश पाटील व अन्य पोलीस आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मुंबईकरिता रवाना झाले आहेत.