ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. १९ : श्रीनगरपासून १० किलोमीटर अंतरावर जम्मू काश्मिरातील उरी शहरातील लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके (२७) हा जवान शहीद झाला.
अमरावती जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नांदगाव खंडेश्वर शहरातील ओंकारखेडा परिसरातील रहिवासी विकास ऊर्फ पंजाब जानराव उईके हा सन २००९ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाला. त्याचे वडील जानरावर उईके हेदेखील ३४ वर्षे भारतीय लष्करात रणगाडा विभागात कार्यरत होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी लष्करात दाखल झाल्यानंतर वडिलांप्रमाणेच आपणही देशसेवा करावी, हे विकासचे स्वप्न होते. मात्र, त्याचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. अवघ्या २७ व्या वर्षी बारामुल्ला येथील रेजिमेंटच्या ६ बिहारमध्ये कार्यरत असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्याला वीरमरण आले.
विकासच्या मृत्युची बातमी नांदगावात पोहोचताच गावात शोककळा पसरली. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. विकासच्या मित्रमंडळींना देखील हा धक्का पचविता आला नाही. संतप्त तरूणांनी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे देत निषेध नोंदविला. विकासच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. विकासच्या मृत्युमुळे संपूर्ण जिल्ह्यावरच शोककळा पसरली आहे. पोलीस प्रशासनासह महसूल विभागदेखील नांदगावात तळ ठोकून आहे. पुत्रवियोगाने आई-बहीण नि:शब्दविकास उईके हा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्याची बातमी नांदगावात धडकल्यानंतर सकाळी ७ वाजतापासूनच त्याच्या घरासमोर गर्दी जमू लागली होती. परंतु तोपर्यंत विकासच्या कुटुंबीयांना ही माहिती नव्हती. मात्र, जमावाच्या चर्चेतून ही कुणकुण विकासच्या आई बेबीतार्इंच्या कानावर पडली आणि त्या काही वेळ नि:शब्द झाल्यात. त्यानंतर बेबीतार्इंसह विकासची बहीण सोनू हिने आक्रोश सुरू केला. विकासच्या बालपणीच्या सवंगड्यांनीही एकच हंबरडा फोडला. हा आक्रोश पाहून समाजमन सुन्न झाले होते. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांशी शेवटचा संवादमंगळवार ६ सप्टेंबर रोजी दूरध्वनीद्वारे विकासने आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. आजारी बहीण सोनूची विचारपूस त्याने अगत्याने केली होती. गावी आल्यानंतर बहिणीला तो भेटणार होता. परंतु तत्पूर्वीच त्याचे निधन झाले. त्याच बहिणीला आणि कुटुंबीयांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. हा प्रसंग सांगताना त्याचा चुलतभाऊ प्रशांत उईके यालादेखील अश्रू अनावर झाले होते. नांदगावात कडकडीत बंद, पाकिस्तानच्या पुतळ्याचे दहन गावचा सुपूत्र विकास देशाचे रक्षण करताना धारातिर्थी पडला. तो शहीद झाला. हे वृत्त गावात पोहोचताच गावकरी स्तब्ध झाले. मात्र, गावकऱ्यांनी शहीद विकासच्या सन्मानार्थ स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. संतप्त तरूणांनी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये देखील बंद केली. काही गावकऱ्यांनी एकत्र येऊन बसस्थानकावर पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा आणि झेंड्याचे दहन केले. पाकिस्तानविरोधी नारेबाजी केल्याने तणावजन्य स्थिती उदभवली होती.