मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे १ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून आता या प्रकरणावरून राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहे. मला अडचणीत आणण्यासाठी ट्रॅप लावला होता असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता.
आता या प्रकरणात आरोपी महिलेचे वडील अनिल जयसिंघानी यांचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. २०१४ मध्ये अनिल जयसिंघानी यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलेल्याचा हा फोटो आहे. अनिल जयसिंघानी हा फरार आरोपी असून त्याचे क्रिकेट बुकींसोबत संबंध आहेत. त्याच्यावर १४-१५ ते गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात दिली होती.
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी याबाबत ट्विट करून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, आणखी एक आयुक्त, उद्धव ठाकरे आणि अनिल जयसिंघानी यांच्या संबंधांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काय षडयंत्र रचलं होतं याची माहिती प्रियंका चर्तुवेंदीनी घ्यावी. या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे प्रकरण?काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात FIR नोंदवत एका महिलेविरोधात १ कोटींची लाच ऑफर दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. माझ्या वडिलांविरोधात चुकीचे गुन्हे नोंद केलेत त्यांना या केसेसमधून सोडवा अशी मागणी तिने अमृता फडणवीसांना केली होती. अमृता यांना ब्लॅकमेलिंग करणारी अनिक्षाचे हीचे वडील अनिल जयसिंघानी आहेत.
अनिल जयसिंघानी यांची माहितीराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेले अनिल जयसिंघानी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी आहेत. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेले जयसिंघानी हे नेहमी पोलिस संरक्षणात फिरायचे. गेल्या आठ वर्षांपासून विविध गुन्ह्यांप्रकरणी ते फरार आरोपी आहेत. जयसिंघानी हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती. २००२ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदार पप्पू कलानी यांची तुरुंगामधून मुक्तता झाल्यावर शहरातील वातावरण कलानीमय झाले होते. ‘राष्ट्रवादी‘ला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. कलानी लाटेत जयसिंघानी हे ‘राष्ट्रवादी‘कडून नगरसेवकपदी निवडून आले होते. २०१४ मध्ये जयसिंघानी यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचं बोलले जाते.