Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणारा वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. महाविकास आघाडीचे नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार घणाघात करत असून, शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. या आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही उडी घेतली असून, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका केली आहे.
एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमृता फडणवीस यांना वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आणि त्यावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प दुसरीकडे गेला आहे. याचे दुःख आहे. पण त्यांच्याशी संबंधित काही लघु प्रकल्प मेक इन इंडियाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये होणार आहेत, याचा आनंद आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमुळेचे हा प्रकल्प झाला नाही, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती का नाही झाली?
दरम्यान, केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला, या शब्दांत नारायण राणे यांनी शरद पवारांनी केलेल्या टीकेचा रोखठोक शब्दांत समाचार घेतला.
काय म्हणाले होते शरद पवार?
फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखे आहे. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जातो हे खरेच दुर्दैवी आहे. यानंतर काही लोकांनी सांगितले की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. तसेच ठाकरे सरकारवर याचे खापर फोडणे अयोग्य आहे. कारण, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत तत्कालीन मंत्रिमंडळात होते. मंत्री होते, असे सांगत शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला.