Amruta Fadnavis On Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी ही योजना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केला जात आहे. तर दुसरीकडे, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे. या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या योजनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील ५ लाखांहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना अमृता फडणवीस यांनी या योजनेवर आपले मत स्पष्ट शब्दांत व्यक्त करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
पैसे महिलांच्या बचत खात्यात यायला लागले आहेत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे रक्षाबंधनाचं गिफ्ट आहे. हे पैसे महिलांच्या बचत खात्यात यायला लागले आहेत. त्यांची छोटी मोठी गरज असले, त्यांना यातून हातभार लागेल. हीच सरकारची इच्छा आहे. स्टंटमॅन लोकांनी हे नको सांगायला कोणी काय करत आहे. हे लोकांसाठी काम करत आहे. स्टंटमॅन लोकांनी नको सांगयला की हे स्टंट सुरू आहेत, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सरकारने १७ तारखेच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचा निधी एकत्रितरित्या मिळून तीन हजार रुपये द्यायला सुरुवात झाली आहे. या योजनेची राज्यभर चलती असल्याचे सांगितले जात आहे.