मुंबई: एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यानं ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो ‘व्हायरल’ झाला होता. त्याचं वय ४५ च्या वर नसतानादेखील त्याला लस कशी काय मिळाली, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले असून, आता अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (amruta fadnavis reacts over tanmay fadnavis got corona vaccine)
देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होत नसतानाही कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह अन्य पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या प्रकरणावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत
कोणत्याही सेवेची प्राथमिकता शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करू शकतो. आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत. आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा, असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असे म्हणत निशाणा साधला होता.
देशात नवा मोदी अॅक्ट आलाय की काय? नवाब मलिकांचा भाजपवर पलटवार
देवेंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण
तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषांप्रमाणे लसीचा डोस देण्यात आला याची मला कल्पना नाही. हे नियांमांनुसार झाले असेल तर त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु नियमांचे उल्लंघन करून जर झाले असेल तर ते अयोग्य आहे. नियमांनुसार पात्र नसल्याने माझ्या पत्नीला आणि मुलीलाही लस देण्यात आली नाही. प्रत्येकाने नियमांचे पालन करावे हे माझे ठाम मत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”
दरम्यान, तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून, त्याचे वय २५ वर्षांहून अधिक नाही. नागपुरातील ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ येथे त्याने लस घेतल्याचा ‘फोटो’ सोमवारी ‘सोशल मीडिया’वर ‘व्हायरल’ झाला. रात्री ‘इन्स्टाग्राम’वरून तो ‘फोटो’ हटविण्यात आला, मात्र तोपर्यंत अनेकांनी ‘स्क्रीनशॉट्स’ घेऊन ठेवले होते.