Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर तब्बल ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. यानंतर काही दिवसांनी खातेवाटप जाहीर झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून शिवसेना सातत्याने केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि बंडखोर शिंदे गटावर टीका करताना पाहायला मिळत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे रोखठोक शब्दांत प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यापासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घेतली. सामना अग्रलेखातून सातत्याने एकनाथ शिंदे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर कडाडून टीका केली जात आहे. सामना अग्रलेखातून होणाऱ्या टीकेसंदर्भात अमृता फडणवीस यांना विचारले असता, मी सामना वाचत नाही. मला त्याबाबतीत काही माहिती नाही. सामनाचे वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे त्यांच्यापेक्षा लोकप्रतिनिधींचे विचार अधिक महत्त्वाचे वाटतात, असा टोलाही अमृता फडणवीस यांनी लगावला.
नव्या सरकारला डबल मेहनतीने काम करणे आवश्यक
शिंदे-फडणवीस सरकारने आता अधिक ताकदीने आणि जोमाने राज्यकारभार करायला हवा. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र राज्य थोडे मागे पडले आहे. पायाभूत सुविधा आणि प्रोजेक्ट्स यावर भर देऊन नव्या सरकारला डबल मेहनतीने काम करणे आवश्यक आहे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळात महिलांनाही स्थान असायला हवे, अशी अपेक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
महिलांनी मेहनत करून कमांड मिळवावी
महिलांनी पुरुषांप्रमाणे अधिक मेहनत करून कमांड मिळवायला हवी. डिमांड करण्यापेक्षा कमांड असण्यावर भर द्यावा, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्थान असायलाच हवे. पुरुषांपेक्षा अधिक मेहनतीने महिला त्या स्थानी बसतील, तेव्हा तिला मिळणारा आदर मोठा असेल, असेही त्यांनी नमूद केले.