महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटी लाच देण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी छापल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. विविध गुन्हात फरार असलेला माजी नगरसेवक अनिल जयसिंघानी यांच्यावरील गुन्हे व आरोप मागे घेण्यासाठी जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिने थेट अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी गुरुवारी दुपारी पोलिसांनी तिला अटक केली. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हल्लाबोल केला होता.
काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
"गुन्हेगाराची मुलगी आधी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी संपर्क साधते. मग मैत्री पाच वर्षे टिकते. ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला महागडे दागिने आणि कपडे देते. गाडीत त्यांच्यासोबत फिरते. ती डिझायनर सट्टेबाजांबद्दल तक्रार करून पैसे कसे कमावता येतील हेदेखील सांगते. इतकं होऊनही मैत्री कायम राहते. आता ब्लॅकमेलिंगचे आरोप होत आहेत. महाराष्ट्रात हे काय चाललंय? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्राचे पोलीस त्यांना रिपोर्ट करतात. आणि या प्रकरणात फिर्यादी स्वत: फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तटस्थपणे चौकशी केली जायला हवी अशी माझी मागणी आहे. हेच जर विरोधी पक्षातील कोणासोबत घडले असते तर उपमुख्यमंत्र्यांनी यावर नक्कीच मोठी कारवाई करत भ्रष्टाचाराचे आरोप लावायला सुरू केली असती आणि ED, CBI किंवा SIT तर्फे चौकशीचे आदेशही दिले असते," असे प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
अमृता फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर
प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटला आता अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्य़ुत्तर दिलं आहे. "मॅडम चतुर, हीच तुमची औकात" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "मॅडम चतुर - आधी तुम्ही खोटा दावा केला होता की, मी Axis बँकेला फायदा करून दिला आणि आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात? अर्थात - तुमचा विश्वास संपादन केल्यावर, जर कोणी-पैसे देऊन केसेस बंद करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधला असता तर तुम्ही अशा व्यक्तीला तुमच्या मालकाद्वारे मदत केली असती - तीच तुमची औक़ात आहे. मला माहीत आहे की, तुमची औक़ात म्हणजे मास्टर्स बदलणे आणि प्रामाणिक आणि स्वतंत्र महिलांना खाली खेचणे. मिस चतुर, तुम्हाला स्वतंत्र तपासासाठी नाक खुपसण्याची काय गरज होती? मी स्वतः याची मागणी करत आहे. जेणेकरून या फसवणुकीमागील खऱ्या चेहऱ्यांसह सत्य उजेडात येऊ द्या," असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण सभागृहात विचारल्याबद्दल अजितदादांचे आभार मानले.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, अनिल जयसंघानी नावाचा व्यक्ती जो गेल्या ७-८ वर्षापासून फरार आहे त्याच्यावर १४-१५ गुन्हे आहेत. त्याच्या मुलीने अत्यंत हुशारीने गेल्या दीड वर्षापासून माझ्या पत्नीचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. अनिल जयसिंघानी यांची मुलगी ती शिकलेली आहे. हुशार आहे. ती २०१५-१६ दरम्यान अमृता यांना भेटत होती. त्यानंतर तिचे येणे बंद झाले. त्यानंतर अचानक २०२१ मध्ये या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणे सुरू केले. मी डिझाईनर आहे. कपडे, ज्वेलरी तयार करते. बेस्ट ५० पॉवरफूल व्ह्यूममध्ये तिचं नाव आले, अमृताच्या हस्ते तिने पुस्तक प्रदर्शन केले अशा वेगवेगळ्या माध्यमातून तिने अमृताचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर एकदा तिने अमृताला सांगितले की, माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये फसवण्यात आलंय. तुम्ही त्यांना सोडवण्यास मदत करा. माझ्या पत्नीने तुम्ही निवेदन द्या. त्यावर चौकशी होईल असं म्हटलं. माझे वडील सर्व बुकीजला ओळखतात. आम्ही बुकीजची माहिती द्यायचो आणि दोन्ही बाजूने पैसे घ्यायचो. आपण असं करू असं तिने अमृताला सांगितले. पण अमृताने त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या वडिलांना सोडवा मग मी १ कोटी देईन अशी ऑफर तिने केली. त्यानंतर वारंवार बुकीजचा विषय निघाला तेव्हा माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केले. हा प्रकार जेव्हा मला कळाला तेव्हा आधी FIR नोंदवला. त्यानंतर काही दिवसांनी एका Unknown नंबरवरून काही व्हिडिओ क्लिप्स आल्या. त्या उघडून पाहिल्या त्यात एक गंभीर व्हिडिओ म्हणजे ती मुलगी बाहेर कुठेतरी एका बॅगेत पैसे भरतेय. तशीच दुसरी बॅग भरून आमच्या बंगल्यावर कामावर असलेल्या महिलेला देतेय. या सर्व गोष्टीची फॉरेन्सिककडून तपासणी झाली आहे. दोन्ही बॅगेचा व्हिडिओ आणि एका पैसे तर दुसऱ्यात कपडे होते. तिने अडकवण्यासाठी ट्रॅप रचला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.