Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवणे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, शिंदे गटासह भाजपवर सडकून टीका केली जात आहे. आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र होऊ शकेल. शिंदे गट आणि भाजपकडूनही शिवसेनेसह महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला चांगलाच खोचक टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला सर्वांत मोठा धक्का नेमका कशाचा बसलाय, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न विचारत अमृता फडणवीस यांनी ४ पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय म्हणजे पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवणे, दुसरा पर्याय म्हणजे ४० आमदार आणि १२ खासदार गमावणे, तिसरा पर्याय म्हणजे प्रदीर्घ काळापासून असलेला भाजपसारखा निष्ठावान युती भागीदार गमावला आणि चौथा पर्याय कट्टर उजव्या विचारसरणीचा हिंदू पक्ष असल्याची ओळख गमावणे, असे चार खोचक पर्याय देत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना डिवचल्याचे सांगितले जात आहे.
याच बदलाची महाराष्ट्र अन् देशाला आज गरज
तत्पूर्वी, अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली. पॉलिटीकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचे काय म्हणणे असते हे ऐकणे गरजेचे असते. माझे फेव्हरेट एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे झिंदाबाद..., असे सांगत अमृता फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला होता. दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले होते. त्यामध्ये "मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे ", या कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांच्या दोन ओळी शेअर केल्या होत्या. अमृता फडणवीस यांनी हे ट्विट रिट्विट करत, याच बदलाची महाराष्ट्राला आणि देशाला गरज असल्याचे म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"