मुंबई – महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महिलांवर अत्याचार होतोय हे दुख:द बाब आहे. गेल्या २ महिन्यापासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत त्यावर साम, दाम, दंड भेद कुठल्याही प्रकारे यावर तडा आणता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:च्या घरात काय चाललंय ते पाहायला हवं. तुमचं लक्ष कुठे आहे? असा सवाल अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) केला आहे.
‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीसांनी(Amruta Fadnavis) राज्य शासनावर टीकास्त्र सोडलं. त्या म्हणाल्या की, बलात्कारी विचारांना ठेचायला हवं. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी जे पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यात त्यांनी काय म्हटलं तर महिला अत्याचाराबाबत २ दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा असं सूचवलं. महाराष्ट्र एक कुटुंब आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याने आपल्याच घरातील कर्त्याला पत्र पाठवलं त्याला तो कर्ता पुरुष दुसऱ्या कुटुंबात काय चाललंय? हे सांगतात. तुम्ही दहा कुटुंबाबद्दल का बोलता? शक्ती कायद्यासाठी २ दिवसांचे विशेष अधिवेशन आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच साकीनाका, डोंबिवली दर ४ दिवसांनी राज्यात महिला अत्याचाराच्या बातम्या पुढे येत आहेत. सुरक्षित मुंबईत अलीकडेच दोन घटना घडल्या. मागच्या वर्षी किती होते? तुम्ही टक्केवारी दाखवू नका. २ महिने लक्ष कुठे आहे? आपल्या माणसांना वसुली मिळतेय यावर लक्ष आहे का? तुम्ही हे प्रकार घडण्यापासून रोखले पाहिजेत अशी मागणीही अमृता फडणवीसांनी केली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना दुसरीकडे काय घडतं हे बघत नव्हते. महिलांवर अत्याचार झाल्यावर त्यांनी केलेल्या कारवाया बघू शकता. मी जे बोलते त्याने फायदा होतो की नुकसान हे पाहत नाही. माझा विचार दृष्टीकोन समोरच्यांकडे पोहचतोय का? त्याला अक्कल येतेय का? हे पाहून बोलते. मला जिथं कळकळीनं बोलावं वाटतं तिथे बोलते. अनेकदा माझ्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे नुकसान झालंय परंतु त्यांनी मला कधीही रोखलं नाही. एक स्त्री म्हणून मी माझं मत मांडते. माझी मागणी एखाद्या राजकीय विचारसरणीतून पाहिली जाते. सामान्य स्त्री म्हणून मी एखाद्या विषयावर मतं मांडत आहे. राजकीय खेळीसाठी मी बोलत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात जे दिसतं ते बोलण्याचा माझा हक्क आहे असंही अमृता फडणवीसांनी ठामपणे म्हंटलं.