पुणे : सध्या विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडवणीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्याचे फोन टॅप केले असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या आरोपांवरून राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. त्यावर आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला भाजप नको आहे. त्यामुळे त्यांनी असे खोटे आरोप केले आहेत अशा शब्दांत फडणवीस सरकारची पाठराखण केली आहे.
पुण्यात आयोजित मकरसंक्रांती निमित्त हळदीकुंकू व न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे त्या म्हणाल्या की,' या तीनही पक्षांना भाजप हटाव पाहिजे, त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करत आहेत. आधीच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील होती. त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या की, राज ठाकरे यांनी पक्षासाठी नवीन दिशा पाहिली कौतुक वाटते आहे. ते खूप चांगलं काम करतील,असे म्हणत त्यांनी ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही, यात सुरक्षा कशी घेतली जाईल असा प्रश्न आहे. मात्र महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला गर्व वाटतो. त्यामुळे मुंबईचे अनुकरण दुसऱ्या शहरांनी देखील करावे,असे मत व्यक्त करत त्यांनी नाईट लाईफला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला.