मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहेत. त्यानंतर आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अमृता यांच्या एका ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांना चक्क आपलं वय जास्त असावं असं वाटतं आहे. "मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे" असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी हे ट्विट केलं आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आज मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटत आहे. कोरोनाच्या लसीकरणाची वाट पाहत आहे. कोरोना अधिक भयावह आहे" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच COVID19, COVIDvaccine, COVIDSecondWave हे हॅशटॅग देखील वापरले आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून वेगाने लसीकरण सुरू आहे. केंद्र सरकारनं देशात 45 वर्ष वयोगटावरील सर्वांना लसीकरणाला परवानगी दिली आहे
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे. कार्मिक मंत्रालयाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, लसीकरणानंतरही कोव्हिड -19 पासून वाचण्यासाठी मार्गदर्शक सूचना पाळण्याची सूचना कर्मचार्यांना देण्यात आली आहे, ज्यात वारंवार हात धुणे, स्वच्छता, मास्क किंवा फेस कव्हर घालणे आणि सामाजिक अंतर इत्यादींचा समावेश आहे.
कोविड -19 चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने लसीकरणासाठी समूहांना प्राधान्य देण्याच्या धोरणावर आधारित 45 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्ती लसीकरण मोहिमेमध्ये सहभाग घेऊ शकतात. केंद्र सरकारच्या सर्व विभाग आणि मंत्रालयांना दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, “वरील बाबी लक्षात घेता 45 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रभावीपणे संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण करण्याचे सूचविले आहे." दरम्यान, देशात गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या चिंताजनक परिस्थितीत हा आदेश आला आहे.
कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत.