पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोन जणांना चिरडलं. यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन मुलाला बार-पबमध्ये प्रवेश देणारे हॉटेल कोझीचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल ब्लँकचे मालक आणि बार व्यवस्थापक यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणीनगर येथील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात पोलिसांकडून कडक कारवाई करून 304 कलम लावले होते. आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास परवानगी आणि पोलीस कोठडी मिळावी, असा बाल न्याय मंडळाकडे अर्ज केला होता. मात्र, बाल न्याय मंडळाने अर्ज फेटाळत जामिनाचा निर्णय घेतला तो पोलिसांसाठी धक्कादायक होता, असं मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आता पुण्यातील घटनेचा निषेध केला आहे. "वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे" असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. दोषी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे! बाल न्याय मंडळाची लाज वाटते" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"आम्ही मुलाच्या पार्टीचे, गाडीचे पुरावे दिले होते, तरीही निर्णय आश्चर्यकारक लागला. बाल न्याय मंडळाची भूमिका सरकारच्या आणि लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे" असेही फडणवीस म्हणाले. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन फडणवीस यांनी स्वत: पुण्यात येत पोलीस विभागाची बैठक घेतली.
पोलिसांनी तत्काळ वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने त्याची दखल घेतली. कायद्यानुसार, बालन्याय मंडळाच्या आदेशावर फेरविचार करायचा असेल तर पुन्हा त्याच न्यायालयात जावे लागते आणि त्यांनी फेरविचार केला नाही तर वरच्या न्यायालयात दाद मागता येते. त्यामुळे कायद्यानुसार, ती कारवाई करण्यात येत आहे. निश्चितपणे बालन्याय मंडळ फेरविचार करेल, अशी आम्हाला खात्री आहे, असंही फडणवीस म्हणाले.