मुंबई - डेमोक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. मतदानानंतर मतमोजणीवरून बरेच दिवस पेच चालल्यानंतर अखेर अध्यक्षीय निवडणुकीत ज्यो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली. तसेच बायडन यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कमला हॅरिस यांच्यासाठी एक ट्विट केलं आहे.
अमेरिकेतील निवडणूक निकालावर अमृता फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. कमला हॅरिस यांच्या विजयानंतर त्यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ रिट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. "अगदी खरं आहे. लोकशाही ही एक स्थिती नसून ती कृती आहे. याचाच अर्थ असा की देशातील लोकशाहीची खात्री देता येत नाही. ही तितकीच मजबूत आहे जितकी त्यासाठी आपली लढण्याची इच्छा. म्हणूनच त्याचं रक्षण करा आणि लोकशाहीला कधीही गृहित धरू नका" अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी कमला हॅरिस यांच्यासाठी केलेल्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे भारताशी खास नाते आहे. त्या आपल्या आईसोबत नेहमी भारतात येत असतात. कमला हॅरिस यांनी 21 जानेवारी 2019 रोजी अमेरिकेच्या 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांनी ज्यो बायडन यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.
अमृता फडणवीसांनी अर्णब गोस्वामींसाठी केलं "हे" ट्विट, म्हणाल्या...
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर ट्विट करून अर्णब गोस्वामी यांचं कौतुक केलं होतं. "बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होतं. यासोबतच ArnabGoswami, MaharashtraGovt, Death Of Democracy हे हॅशटॅग देखील वापरले होते.