मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. "आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे" असं म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर ट्विट करून अर्णब गोस्वामी यांचं कौतुक केलं आहे. "बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!" असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच ArnabGoswami, MaharashtraGovt, Death Of Democracy हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य – शिवसेना
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य आहे, सबळ पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात, ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कोणावरही सुडबुद्धीने कारवाई केली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
“आवाज उठवा, मोर्चा काढा...दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणं हाच भारताचा नारा”
भाजपाने कार्यकर्त्यांना राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आवाज उठवा, मोर्चा काढा, राज्य सरकारचा विरोध करा अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे राज्यात भाजपाविरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलं आहे.