पुणे : राज्यामध्ये मराठा समाजाचे आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. जालन्यात उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना अद्याप समजावून सांगण्याचे काम कोणी करू शकले नाही, या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या राज्यातील सर्व पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बोलवली आहे, असे अजित पवार म्हणाले. आज कोल्हापुरात अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
दरम्यान, कोल्हापूरला रवाना होण्यापूर्वी अजित पवार यांचा पुण्यात रोड शो आयोजित केला होता. सकाळी आठ वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची अजित पवार यांनी आरती केली. त्यानंतर त्यांचा रोड शो झाला. यादरम्यान राष्ट्रवादीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी शहरात अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री व्हावे अशी मागणी करणारे बॅनर लावले आहेत. याबद्दल विचारले असता, अजित पवार म्हणाले की, "अलीकडे महाराष्ट्रात नवीन फॅड आले आहे. राज्यात काही ठिकाणी राज ठाकरेंचे, काही ठिकाणी पंकजा मुंडे यांचेही बॅनर लागले आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. मागे मुंबईत राष्ट्रवादी भवनच्या बाहेर एक दिवस माझे, एकदिवस जयंत पाटील यांचे तर एक दिवस सुप्रिया सुळेंचे बॅनर लागले होते. हे काही आम्ही सांगत नाही."
याचबरोबर, पुढे अजित पवार म्हणाले की, बॅनर लावून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही. कोणाला मुख्यमंत्री पद मिळवायचं असेल तर १४५ चं मॅजिक फिगरचा आकडा, जो गाठू शकतो तो मुख्यमंत्री होतो. जसं मागे उद्धवजी, देवेंद्रजीनीं गाठला आता एकनाथ शिंदे यांनी गाठला. याशिवाय, पत्रकाराने तु्म्ही लेट झालात? असं विचारताच अजित पवार म्हणाले की, लेटचा प्रश्न नाही, मी तसं म्हणणं बरोबर नाही, पण तो नशिबाचा भाग असतो असेही यावेळी अजित पवार म्हणाले.