मुंबई : गेल्या वर्षभरात राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या ३४ हजार अपघातांमध्ये तब्बल १५ हजार जणांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असले तरी अपघाती मृत्यू रोखण्यास यश आले आहे. वर्षभरात महिन्याला सरासरी २,८४२ अपघात झाले. त्यामध्ये दरमहा १,२५० जणांचे बळी गेले आहेत.
राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. पुण्यात सर्वाधिक, म्हणजे तब्बल एक हजार ६० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षात राज्यात सर्वाधिक अपघात हे पुणे आणि त्या खालोखाल अहमदनगर जिल्ह्यात झाले आहेत. गेल्या पाच वर्षांमधील अपघातांची संख्या पाहता अपघातांचे प्रमाण तुलनेने घटले आहे.
अपघात झाले कमी वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने झालेले बदल हे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे प्रमुख कारण आहे. रस्त्यांवरील बहुतांश काम मार्गी लागल्याने, उड्डाणपुलांचेही काम पूर्ण झाल्यानेही अपघातात काही अंशी घट झाली आहे.