शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणीवरील उलटतपासणी आज पूर्ण होऊ शकलेली नाहीय. विधासभेतील सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची आजही उलटतपासणी घेतली. यामध्ये त्यांनी प्रभू यांनी साक्ष बदलत ईमेल वरून पत्र पाठविल्याच्या दाव्यालाच लक्ष्य केले आहे. काल प्रभूंनी जो ईमेल आणला तो बनावट आहे, असा दावा जेठमलानी यांनी केला आहे.
काल सादर करण्यात आलेल्या ई-मेल संदर्भात अर्ज दिला आहे. खूप सारे बोगस कागदपत्रे आहेत. इतरही अनेक कागदपत्रे बनावट आहेत, पण आमचा फोकस हा ईमेलवरच आहे, असे जेठमलानी म्हणाले. तसेच प्रभू यांनी बऱ्याच प्रश्नांना ते रेकॉर्डवर आहे, अशीच उत्तरे दिल्याचे ते म्हणाले.
ईमेलबाबत अनेक गोष्टी विरोधाभासी आहेत. जर या कोर्टात काही चुकीची गोष्ट झाली असेल तर सगळे पुरावे एकत्र करून कोर्ट आपला निकाल देईल. पक्ष विरोधी कारवाईची काय प्रक्रिया आहे, कारणे दाखवा नोटीस दिली जाते का नाही सुनावणी घेत की नाही, यावर त्यांचे एकच उत्तर होते की जे काय आहे ते रेकॉर्डवर आहे. 4 एप्रिलला अनिल देसाई यांनी एक लेटर दिले आहे. पण ते निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नाही, असाही दावा जेठमलानी यांनी केला.
23 जानेवारी 2018 ला झालेल्या निवडणुकीचे निकाल आणि शिवसेनेच्या घटनेत ज्या काही सुधारणा करण्यात आल्या त्या सगळ्या या पत्रात होत्या. पण हे देखील एक बनावट डॉक्युमेंट आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान देखील हे डॉक्युमेंट्स सादर केले नव्हते. निवडणूक आयोगातील सुनावणीत देखील हे डॉक्युमेंट नव्हते. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल अपीलमध्ये देखील हे डॉक्युमेंट नाहीय, पहिल्यांदाच ते समोर आले आहे, असे जेठमलानी यांनी सांगितले.
त्यांच्या केसचा आधार असलेली सगळी कागदपत्रे बनावट आहेत व ती कधीही पाठविली गेली नाहीत. त्यावरील सह्या खोट्या आहेत किंवा ती आता बनवली आहेत, असा दावा जेठमलानी यांनी केला. ज्या ईमेल आयडीवर पत्र सादर केले तो एकनाथ शिंदे यांचा ई-मेल आयडी नाहीय. त्याचा रीड बॅक देखील ते सादर करत नाहीत. ते म्हणतात त्यांनी पाठवले पण त्यांना मिळाले की नाही हे माहीत नाही. आता उद्या व्हीपच्या उल्लंघनासंदर्भात सुनावणी होईल, उद्या मी उलट तपासणी पूर्ण करेन, असे जेठमलानी म्हणाले.