बीडमधील मुंडे बहीण-भाऊ यांच्यातील सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री सहा वर्षानंतर एकत्र एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यामुळे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील दरी कमी होत असल्याची चर्चा होत आहे.
सत्ता संघर्षावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मुंडे बहिण भावाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पहिला आहे. मात्र याच संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रसंगी पंकजा मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे, असे म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याचे संकेत दिले. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली.
धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झाले. आम्ही दोघेही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा. त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा पण शक्ती सारखी आहे. दोघे एकाच पाठीवर जन्माला आलो आमचे भविष्य काही वेगळे असेल. त्यासाठी काही वेळ वाट पाहा, असे सूतोवाचही त्यांनी केले.
यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झाले आहे, असे म्हटले. विचारांमध्ये भलेही कोसांर दूर असली तरी चालेल वर घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं. मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय निर्माण करण्याचे कारण नाही. असे म्हणत गडाच्या वादावर ही पूर्णविराम दिला.
मोठा भाऊ या नात्याने माझ्या लहान बहिणीने भगवानगडासाठी जे करायला सांगितलं आहे. ते मी सर्व करेन. आमचे एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही. राजकीय विचाराच्या वाटण्या आहेत, असे सांगितले.
तेवढ्यात सभेतून एकाने त्यांना दोघांनीही एकत्र यावे अशी मागणी केली. यावर देखील राजकीय गणित मांडले. जे होतं ते बऱ्यासाठी होतं, असे म्हणताना पंकजा दोन वेळेस आमदार राहिल्या. त्या मंत्री झाल्या. त्याच पद्धतीने मी आमदार झालो. विरोधी पक्षनेता झालो आणि मंत्रीही झालो. जर आम्ही वेगळे झालो नसतो तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता, आता तुम्ही समजून घ्या, म्हणत धनंजय मुंडे यांनी आम्ही दोघे एकच आहोत असे संकेत दिले.